Sunday, December 28, 2008

बापटांनी मराठ्यांवर अन्याय केला- मेटे
मराठा समाजावर बापट आयोगाने अन्याय केला असून या अहवालाचा निषेध तसेच होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने हा अहवाल त्वरित सराफ आयोगाकडे पाठवावा आणि आगामी निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे ठराव मराठा समन्वय समितीच्या मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. डॉ. नितू मांडके हाऊस येथे रविवारी समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची मेटे यांनी माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चार जानेवारीला रायगडापासून आरक्षण जागृती यात्रा काढण्यात येणार असून त्याचा समारोप एक फेबुवारीला शिवाजी पार्क येथे होणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. बैठकीत समितीची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणारच - विनायक मेटे
परभणी, ता. २८ - मराठा समाजास आरक्षण देण्याचा मुद्दा सरकारदरबारी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येत आहे. आता आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज, विविध मराठा संघटना एकत्र आल्या आहेत.त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळवून देऊ, असा निर्धार माजी आमदार तथा "शिवसंग्राम'चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी रविवारी (ता.२८) येथे व्यक्त केला. मराठा समन्वय समितीतर्फे आयोजित मराठा आरक्षण जागृती परिषदेत ते बोलत होते. कल्याण मंडपम सभागृहात ही परिषद झाली. व्यासपीठावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जयश्री शेळके, छावा संघटनेचे प्रा. देविदास वडजे, महाराष्ट्रीयन मराठा संघटनेचे अंकुश पाटील, "गृहवित्त'चे अध्यक्ष संतोष बोबडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव वरपूडकर, किशनराव वरखिंडे, सुरेश माने, राजेंद्र कोंडारे, बाळासाहेब मोहिते, धाराजी भुसारे यांच्यासह विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. मेटे म्हणाले,""पिढ्यान्‌पिढ्या मराठा समाज शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील कोणत्याही नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. ९० टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदे आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्या समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात असूनही आपल्या जातीसाठी कोणत्याही नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. प्रशासकीय क्षेत्रात समाजाचा एखाददुसरा अधिकारी आहे. समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती होणार आहे. त्यासाठीच सर्व संघटना एकत्र आल्या आहेत.'' ""आता ता. ११ ऑक्‍टोबरला ठाणे, ता. १७ व १८ ऑक्‍टोबरला नाशिक येथे आरक्षण जागृती परिषद होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येतील. जानेवारी २००९ मध्ये मुंबई येथे आरक्षणासाठी "देता की जाता?' मोर्चा काढण्यात येणार आहे,'' अशी माहितीही श्री. मेटे यांनी दिली. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जयश्री शेळके म्हणाल्या, ""एकीकरणामुळे शासनावर दबाव निर्माण होत असून काही महिन्यांत निश्‍चितच आरक्षण मिळेल. त्यासाठी महिलांनीही आंदोलनात सहभागी व्हावे.'' विजय वरपूडकर म्हणाले, ""राजस्थानात गुज्जर समाजाने आरक्षणासाठी एकजुटीने लढा दिला तसा लढा द्यावा. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व पक्षांतील मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढ्यात राहणार असून वेळ पडल्यास पक्षाचा राजीनामा देऊ.'' या वेळी मराठा एकत्रीकरण समितीच्या अध्यक्षपदी श्री. मेटे यांची निवड करण्यात आली. बब्रूवाहन शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल भुसारे यांनी सूत्रसंचालन केले. किशनराव वरखिंडे यांनी आभार मानले. परिषदेसाठी डॉ. विलास मोरे, डॉ. शंकरराव देशमुख, का. स. शिंदे, रणजित कारेगावकर, गजानन जोगदंड, भानुदास शिंदे, माणिकराव मोहिते, ऍड. विष्णू नवले, बाळासाहेब यादव, अशोक सालगुडे, श्रीनिवास जोगदंड, सखाराम गायकवाड, दत्ता बुलंगे, रुक्‍मिणी जाधव, विठ्ठल तळेकर, प्रमोद टोंग, भाऊसाहेब गिराम, डॉ. बालासाहेब लंगोटे, माणिकराव मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. परिषदेस मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

आरक्षण हवेच, पण नव्या लोकसभेपूर्वीच - विनायक मेटे

, ता. २७ - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. अन्यथा आरक्षणविरोधी भूमिका घेणारे शासन व नेत्यांच्या विरोधात मतदान करण्यात येईल, असा इशारा मराठा समन्वय समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिला.आमदार मेटे यांनी शनिवारी रामदासपेठ येथील "सकाळ'च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आरक्षण मराठा समाजातील गरिबांच्या विकासासाठी मागण्यात येत आहे, असे स्पष्ट करून श्री. मेटे म्हणाले, राज्यातील ३५ ते ४० टक्के मराठा समाजाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी आरक्षण मागण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समावेश करून २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी आहे. मात्र, हे आरक्षण देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५२ टक्के आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, अशीही भूमिका घेण्यात आली आहे. आमचा लढा कुण्या समाजाच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे इतर राज्यात देण्यात आलेल्या आरक्षणाप्रमाणे सरकारने मराठा समाजाचा विचार करून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या आरक्षणाच्या मागणीला विविध पक्ष व विविध समाजांचाही पाठिंबा मिळत आहे. व्यक्तिशः सरकारमध्ये असलेल्या काही नेत्यांचा पाठिंबाही मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणावर विचार करण्यात यावा. एक उपसमिती नेमून आरक्षण लागू करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात यावे. अन्यथा आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या विरोधात मराठा समाज मतदान करायला मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. येत्या ४ जानेवारीपासून आरक्षण यात्रा सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महामेळावा घेऊन आरक्षणाबाबतच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे श्री. मेटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीपाद अपरा जित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विनायक मेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण कृती समितीचे अतुल लोंढे, विजय रसाळ, सुरेश कदम, प्रभाकर भोसले, नरेंद्र कडू, धनराज शिंदे उपस्थित होते.

मराठ्यांच्या २५ टक्के आरक्षणासाठी लढा देणार - विनायक मेटे

ठाणे, ता. ७ - वतनदार, जमीनदार, जहागीरदार म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठा समाजातील मूठभर लोकांचा अपवाद वगळता बहुसंख्य समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.इतर समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे नाही. त्यामुळेच मराठा समाजासाठी नव्याने २५ टक्के आरक्षण निर्माण करण्याच्या मागणीसाठी आम्ही लढा देणार आहोत. याबाबत ११ ऑक्‍टोबरला तपशिलात धोरण जाहीर करणार असल्याचे मराठा आरक्षण परिषदेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. मराठा समन्वय समितीच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी परिषदेचे निमंत्रक प्रभाकर सावंत, किरण चव्हाण आदी उपस्थित होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी दहा वाजता मराठा आरक्षण परिषदेचा मेळावा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मराठा, कुणबी समाजातील सर्वपक्षीय आमदारांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, मराठा समाजाला सर्व क्षेत्रात २५ टक्के आरक्षण लागू करावे आदी मागण्यांसाठी जनजागृती केली जाणार आहे. या वेळी विनायक मेटे यांच्यासह भारतीय मराठा महासंघाचे किसनराव वरखिंडे, शिवसंग्रामचे तानाजीराव शिंदे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे विजयसिंह महाडिक, महाराष्ट्रीय अंकुशराव पाटील, छावा मराठा युवा संघटनेचे देविदास वडजे, छावा संघटनेचे चंद्रकांत भराड, मराठा महासंघाचे सुरेशराव माने आदी उपस्थित राहणार आहेत. राजकारणातील मूठभर प्रबळ मराठ्यांवरून संपूर्ण समाजाचा आढावा घेणे चुकीचे आहे. आजच्या घडीला मराठा समाजातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने आत्महत्येला सामोरे जावे लागत आहे.
मराठा आरक्षणासाठी हुतात्मा होण्यास तयार - विनायक मेटे
ठाणे, ता. ११ - मराठा समाजाच्या हितासाठी काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चानंतर बाबासाहेब भोसले या मराठा मुख्यमंत्र्यांनीच त्याची दखल न घेतल्याने अण्णासाहेब पाटील यांना हुतात्मा व्हावे लागले.आजच्या घडीला मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नाला तडीला नेण्यासाठी पुन्हा एकदा हुतात्मा होण्याची वेळ आली आहे. समाजासाठी दुसरा हुतात्मा होण्याची माझी तयारी असून या प्रश्‍नावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी अशा हुतात्म्यांची साखळी होणे आवश्‍यक असल्याचे मत मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी किसनराव वरखिंडे, सुरेश माने, देवदास वडजे, अकुंशराव पाटील, प्रभाकर सावंत, किरण चव्हाण आदी उपस्थित होते. मराठा समाजाचे लोक आमदार, खासदार पदावर बसल्याची पोटदुखी अनेकांना आहे, पण हे सत्ताधारी म्हणजे संपूर्ण समाज नसून तो फक्त पाण्यावरील तवंग आहे. या तवंगाच्या खाली गरिबीने पिचलेला समाज उरला आहे, पण या समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा नेता न मिळाल्याने कायम अन्यायाला सामोरे जावे लागले. मराठा हा जातीवाचक नाही, तर गुणवाचक शब्द आहे. लढण्यासाठी गेले ते मऱ्हाटा, तर शेतीसाठी राबणारे कुणबी म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवरायांच्या काळात अगदी एका घरात एक भाऊ मऱ्हाटा आणि एक कुणबी असे. रामदास स्वामींनीही मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही शिकवण एका समजाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून दिली होती. असे असतानाही मराठा समाजावर सातत्याने अन्याय केला गेला. या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षण न मिळाल्यास गुज्जर आंदोलनाप्रमाणे मराठा समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. डिसेंबर महिन्यात चलो मुंबईचा नारा देऊन "देता का जाता' ही घोषणा दिली जाणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. त्यापूर्वी जिल्हा स्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर शिवसेनेची भूमिका दोन दिवसांत

मराठा समाजाच्या आरक्षणावर शिवसेना दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी विनायक मेटे, किसनराव वरखिंडे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे भेट घेतली. मराठा महासंघ, छावा, आदी मराठा संघटनांच्या नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेेश होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चचेर्त समन्वय समितीच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका विशद केली. शिवसेना कोणतीही जात-पात मानत नाही. आथिर्क दुर्बल घटकांना आरक्षण द्यावे, ही शिवसेनेची भूमिका आहे. तरीही मराठा आरक्षणाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल, असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत मराठा समाजाच्या तरुणांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा, असे मेटे यांनी सांगितले.





No comments: